अहमदनगर : महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. कोरोनाबाधित कुटुंबासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यासाठी ७३ वसुली लिपिकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिका उपायुक्त प्रदीप पठारे यांनी गुरुवारी सायंकाळी लिपिकांच्या नेमणुकीचा आदेश काढला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी प्रमुख अधिकारी म्हणून उपायुक्तांसह सहायक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविण्यासाठी उपायुक्त पठारे यांची, तर कोरोना केअर सेंटरचे नियंत्रण अधिकारी म्हणून दुसरे उपायुक्त यशवंत डांगे यांची नियुक्ती केली गेली आहे. तसेच सहायक आयुक्त संतोष लांडगे यांची कोरोनाबाधित कुटुंब व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यासाठी नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या मदतीला चारही प्रभाग कार्यालयांचे ७३ वसुली लिपिक देण्यात आले आहेत. हे कर्मचारी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरानाबाधित व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतील. तशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांची केलेली नेमणूक कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही. कर्मचाऱ्यांनी कामात दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
....
शासकीय तंत्रनिकेतन येथे सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती
महापालिकेच्या वतीने बुरुडगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. केंद्राचे प्रमुख म्हणून राकेश कोतकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या मदतीला सहा कर्मचारी देण्यात आले आहेत.
....
कोरोनासाठी जम्बो भरती
महापालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात १०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आदी पदांचा समावेश आहे. या पदांसाठी शनिवारी मुलाखती घेण्यात येणार असून, पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.
...
पहिल्या दिवशी दीड हजार जणांना लस
शासनाने ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोरोनावरील लस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिकेला ६ हजार डोस प्राप्त झाले असून, पहिल्या दिवशी गुरुवारी दीड हजार नागरिकांना लस देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.