पाथर्डी : भगवानगडाचे सध्याचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांना अमेरिकेला जायचे होते. मात्र मुंडे यांनीच शास्त्री यांच्यातील गुण हेरून गडाचे महंत होण्याची सूचना केली. भिमसिंह महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शास्त्री यांच्या निवडीची मुंडे यांनीच घोषणा केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गडावर आणण्याचे स्वप्नही आता अधुरे राहिले आहे. भगवानगड, विजया दशमी, गोपीनाथ मुंडे यांचे अतुट नाते होते. भगवानगडावर गोपीनाथ मुंडे दर दसरा मेळाव्याला आवर्जुन उपस्थित रहायचे. काहीही झाले तरी मुंडे दसरा मेळाव्याला येणारच, अशी खात्री असल्याने दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येत भाविक यायचे. गडाच्या विकासासाठी त्यांनी तन मन धनाने प्रयत्न करून गडाचे नाव देशभर नेले. भगवानबाबांवर त्यांची अपार श्रध्दा होती. बाबांच्या नावाने त्यांनी पोस्टाचे तिकीट काढण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसापूर्वीच त्यांनी भगवानगडावर येवून बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्याठिकाणी गडाच्या वतीने त्यांचा सत्कार झाला. या सोहळ्यात मुंडे यांनी सन 2015 साली होणार्या पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते.भगवानगडाचा झालेला विस्तार मुंडे यांच्यामुळेच होता. गोपीनाथ मुंडे यांनीच गडावर मोठे मोठे सप्ताह घडवून आणले. भगवानबाबा यांच्याइतकीच भाविकांची मुंडे यांच्यावर अपार श्रद्धा होती. मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त भगवानगडावर समजताच भक्तांना मोठा धाक्काच बसला. गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री गडावर उपस्थित होते. त्या ठिकाणी जमलेल्या भावीकांनी आज दिवसभर अन्नाच्या एका कणाला सुध्दा हात लावला नाही. भाविकांनी टाहो फोडला. (तालुका प्रतिनिधी)
मुंडेंनीच निवडला गडाचा उत्तराधिकारी
By admin | Updated: June 4, 2014 00:14 IST