अहमदनगर : कुख्यात गुंड नयन राजेंद्र तांदळे याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोका कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीविरोधात सुपा पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकाकांकडे (नाशिक) प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
टोळीप्रमुख नयन राजेंद्र तांदळे (२५, रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (२७, झापवाडी, ता. नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (२६, रा. सावेडी, नगर), शाहुल अशोक पवार (३१) व अमोल छगन पोटे (२८, रा. दोघे सुपा, ता. पारनेर) या पाच गुंडांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीच्या विरोधात सुपा, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी करणे, जबरी चोरी करणे, रस्तालूट, शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
...........
अनेक टोळ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित
जिल्ह्यात संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली असून येणाऱ्या काळात या टोळ्यांविरोधात हद्दपारी, तडीपार व मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.