अहमदनगर : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळे राज्यात चमत्कार होऊ शकतो. राजकारणात काहीही होऊ शकते. शिवसेना-भाजपची युती झाली तर त्याचे स्वागतच आहे, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर येथील एका महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर शनिवारी विखे पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मंत्र्यांकडे पाहून ‘एकत्र आलो तर भावी सहकारी’, असे वक्तव्य केले होते. त्याकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधलेली आहे. त्याला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. सत्ता नव्हती त्यावेळीही शिवसेना-भाजपने २५ ते ३० वर्ष सोबत काम केले आहे. त्यामुळे भविष्यात एकत्र आले तर त्याचे स्वागतच आहे.
-------------
थोरातांनी ‘मुंगेरीलाल के सपने’ पाहू नयेत
‘मला माजी नव्हे तर मंत्री म्हणा. दोन तीन दिवसात कळेल’ या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर विखे यांनी मात्र मी भाष्य करणार नसल्याचे सांगितले. दुसरीकडे ‘भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत’,असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते. याबाबत विखे म्हणाले, थोरात यांनी स्वत:च्या नेत्यांचे राज्यात किती अवमूल्यन सुरू आहे, हे आधी बघावे. लाचार होऊन व टिकून राहण्यासाठी ते सत्तेत आहेत. याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. पक्षाचे हित पाहण्यापेक्षा स्वत:चेच हित पाहण्यात मंत्री व्यस्त असल्याने कॉंग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होत आहे, हे दुर्दैव आहे.
-------------
पाण्याबाबत प्रादेशिक वाद नको
‘नगर-नाशिकने सत्तेचा गैरवापर करून मराठवाड्याचे पाणी अडवले’, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात सांगितले होते. यावर विखे म्हणाले, अपुऱ्या माहितीच्या आधारे सत्तार यांनी वक्तव्य केलेले आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. वरच्या धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला की आपोआपच जायकवाडीचे धरण भरते. त्यामुळे विनाकारण कोणी प्रादेशिक वाद निर्माण करू नये.