बेलापूर येथे नुकतीच विखे यांनी समर्थकांची बैठक घेतली. त्यावेळी विखे बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब पवार, जि.प. सदस्य शरद नवले, पं.स.चे उपसभापती बाळासाहेब तोरणे, भाजपचे नेते प्रकाश चित्ते, नानासाहेब शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, विठ्ठल राऊत आदी उपस्थित होते.
आमदार विखे म्हणाले, आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढविल्या जातील. सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबतही बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. व्यक्तीद्वेषाच्या राजकारणातून मनोरंजन होते. परंतु संघटनेची बांधणी होत नाही. तरुण, बेरोजगार, महिला यांना बरोबर घेऊन त्यांचात आशावाद निर्माण करावा लागेल. मंत्रालयात भ्रष्टाचार बोकाळला असून वाळूमाफियाचा धुडगूस सुरू आहे. यावर कोणीही बोलत नाही. सरकारला कोरोनाचे कारण झाले आहे. वाळूमाफियांना मात्र कोरोना नाही. फक्त योजनांच्या अंमलबजावणीला कोरोनाचा बहाणा केला जातो. आघाडी सरकारची तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.. अशी अवस्था झाली आहे.
यावेळी दीपक पटारे, भाऊसाहेब बांद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीधर आसने, सरपंच महेंद्र साळवी, गणेश मुदगुले, निवृत्ती बडाख, अनिल भनगडे, संदीप चोरगे, भीमा बागुल, रामभाऊ लिप्टे, राधाकृष्ण आहेर आदी उपस्थित होते.