अहमदनगर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाची सभा मंगळवारी अवघ्या अर्ध्या तासात गुंडाळली. मंडळाचे सदस्य असणारे दोन खासदार, सर्व आमदार आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत नियामक मंडळाची सभा पार पडली. अवघा अर्धा तास चाललेल्या या बैठकीत सुरूवातीलाच आयसीआयसी बँकेडून दारिद्रय रेषेखाली लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवत असल्याने बँकेत असणारे खाते गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात २००५-०६ पासून २८ हजार ५०० रुपये अनुदानापासून ६८ हजार ५०० अनुदानापर्यंत असणारी २ हजार ४६६ जुन्या घरकुलांची कामे रद्द करून त्याऐवजी १ हजार ७४८ नवीन घरकुलांच्या कामांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.मागास भागाचा विकास योजनेचा (बीआरजीएफ) या वर्षीच्या ३२ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या योजनेत आरोग्य, महिला बालकल्याण विभागातील कामे, तसेच इतर विभागात जी कामे करता येऊ शकत नाहीत, अशा कामांना बीआरजीएफ मधून निधी देण्यात येतो. गेल्यावर्षी या योजनेसाठी ४२ कोटी रुपयांचा आराखडा होता. मात्र, यातून २६ कोटी ९३ लाख रुपये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झाले होते.उर्वरित निधी केंद्र सरकारने अन्य योजनेकडे वळविला. यामुळे मोठ्या प्रमाणात कामे अपूर्ण राहिली होती. गतवर्षीच्या अपूर्ण कामांसाठी यंदाच्या आराखड्यात ११ कोटी ९३ लाखांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी प्रभाकर गावडे यांनी दिली. सभेला कॅफो अरूण कोल्हे, डॉ. अजित फुंदे, गटविकास अधिकारी यांच्यासह अन्य विभागातील काही अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
नियामक मंडळाची बैठक गुंडाळली
By admin | Updated: August 19, 2014 23:27 IST