अहमदनगर: कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढी येत्या पंधरा दिवसांत सुरू करण्याचा आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रक्तपेढी सुरू करण्याबाबत बैठक झाली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, लेखा अधिकारी पी. जी. मानकर आदी उपस्थित होते. महापालिकेची रक्तपेढी कर्मचाऱ्यांअभावी बंद आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे. रक्तपेढीसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, सुपरवायझर आदी पदे भरण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे बैठकीत ठरले. महापौर वाकळे म्हणाले, की रक्तपेढीसाठी आवश्यक असणारे कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. कर्मचारी उपलब्ध केल्यानंतर रक्तपेढी तातडीने सुरू करा. खासगी रक्तपेढीतून रक्त पिशव्या विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रक्ताची आवश्यकता आहे. त्यामुळे मनपाची रक्तपेढी सुरू करून रक्त विघटन केलेले रक्त उपलब्ध होईल, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे वाकळे म्हणाले.