श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोड बोगदा प्रकल्पाबाबत कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ व त्यांच्या टीमशी लवकरच चर्चा करणार आहे. त्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी मास्टर प्लॅन आखणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’ला दिली.
बेलवंडी कोठार (ता. श्रीगोंदा) येथे दत्तात्रय कोठारे यांच्या निवासस्थानी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी डिंभे-माणिकडोह जोड बोगदा प्रकल्पाकडे उपस्थितांनी लक्ष वेधले. यावेळी विखे बोलत होते.
डिंभे-माणिकडोह जोड बोगदा प्रकल्पाचे काम १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. ते काम पूर्ण होत नसल्याने पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यांतील ९० हजार हेक्टर शेती सिंचनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. हा बोगदा झाला तर ६ टीएमसी पाणी अधिकचे मिळणार आहे.
याबाबत विखे म्हणाले, केंद्र शासनाने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन, तांत्रिक मान्यता देऊन हा प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या कामास केंद्र सरकारच्या माध्यमातून ६० टक्के निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तांत्रिक मान्यता देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. यामध्ये सरकारने वेळकाढूपणाचे धोरण घ्यायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केशव मगर, जिजाबापू शिंदे, रमेश गिरमकर, बापू गोरे, बाळासाहेब गिरमकर, दत्तात्रय कोठारे, संग्राम घोडके, अशोक खेंडके, शहाजी हिरवे, अजित जामदार, अनुजा गायकवाड, विजय शेंडे, संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर, अंबादास औटी उपस्थित होते.
----
लाभक्षेत्रातील शेतकरी हतबल..
कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याच्या प्रलंबित प्रश्नाचे अनेक वर्षांपासून राजकीय भांडवल आणि राजकीय टोलवाटोलवी चालू आहे. त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यातील शेतीचे वाळवंट होत चालले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.