कर्जत/ जामखेड : कर्जत-जामखेड मतदार संघातील रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
गडकरी यांची पवार यांनी नुकतीच दिल्लीत भेट घेतली. मतदार संघातून जाणाऱ्या पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी दरम्यान रखडलेले ११४ किलोमीटरचे काम जलदगतीने सुरू करणे, खर्डा गावापर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे मात्र खर्डा ते कुर्डूवाडीपर्यंतचा पुढील भाग प्रलंबित आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी यावेळी पवार यांनी केली.
सोबतच मतदार संघातील श्रीगोंदा आणि जामखेड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ ‘ड’चे काम तसेच अहमदनगर - सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५१६ ‘अ’ या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यांची कामे सुरू व्हावीत, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत काही निधी मतदार संघासाठी मिळावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत, केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेऊन चर्चा केली.
---
रस्ता पॅचिंगलाही मिळणार निधी
अहमदनगर ते जामखेड, बीड आणि दुर्गम भागातील गावे, जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५६१चे ५१ किलोमीटरच्या अंतराचे काम मागील वर्षी पूर्ण झाले आहे. मात्र, साबळखेड-आष्टी-चिंचपूर-जामखेड येथून २० किलोमीटरचा पॅच गेल्या ६ वर्षांपासून रखडला आहे. मुसळधार पावसामुळे या मार्गाची अधिकच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याला पुरेसा निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी नितीन गडकरी यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.
----
१६ रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.