जामखेड : तालुक्यातील साकत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साकेश्वर ग्रामविकास मंडळाच्या मनीषा सर्जेराव पाटील, तर उपसरपंचपदी बळीराम बाजीराव कोल्हे यांची अवघ्या एक मताने निवड झाली. सत्ताधारी साकेश्वर ग्रामविकास मंडळाकडे सात, तर साकेश्वर परिवर्तन मंडळाकडे सहा मते होती.
साकत ग्रामपंचायतीकडे जामखेड तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर व युवा नेते हनुमंत पाटील यांच्या साकेश्वर ग्रामविकासने बाजी मारत चौथ्यांदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले. डॉ. भगवानराव मुरुमकर व माजी सरपंच हनुमंत पाटील यांच्या गटाकडे सात, तर बाजार समितीचे संचालक संजय वराट व साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या गटाकडे सहा जागा होत्या. त्यामुळे डॉ. मुरुमकर व हनुमंत पाटील यांच्या मंडळाचा सरपंच होणार हे निश्चित होते.
सरपंचपदासाठी मनीषा पाटील, रूपाली वराट, जिजाबाई कोल्हे यांनी अर्ज भरले होते, तर उपसरपंचपदासाठी बळीराम कोल्हे, राजू वराट, मिलन घोडेस्वार यांनी अर्ज भरले होते. जिजाबाई कोल्हे, मिलन घोडेस्वार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सरपंचपदासाठी दोन, उपसरपंचपदासाठी दोन अर्ज राहिले. गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले.
सरपंचपदासाठी मनीषा पाटील यांना सात मते पडली, तर रूपाली वराट यांना ६ मते पडली. उपसरपंचपदासाठी बळीराम कोल्हे यांना सात मते पडली तर राजू वराट यांना सहा मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी सरपंचपदी मनीषा पाटील, तर उपसरपंचपदी बळीराम कोल्हे यांची निवड जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदकुमार गव्हाणे, सहाय्यक ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, तलाठी सचिन खेत्रे यांनी काम पाहिले.
--
३१ साकत
साकत ग्रामपंचायतीचे सरपंच मनीषा पाटील, तर उपसरपंच बळीराम कोल्हे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, हनुमंत पाटील व ग्रामपंचायत सदस्य.