निघोज : वादळी पावसामुळे निघोज परिसरात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कांदा, गहू काढणीला आले आहेत. डाळिंब, द्राक्षे बागांचीही फळधारणा चालू आहे. अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. कोरोनामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आला आहे. त्यातच कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारने मोठी मदत करून नुकसानीचे पंचनामे व कांदा भाववाढीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न करावा, अशी मागणी निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे, अमृता रसाळ, सचिव रामदास वरखडे, रवींद्र रसाळ, पांडुरंग कृपा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय गुंड, चंद्रकांत लंके यांनी केली आहे. लवकरच या संदर्भात आमदार नीलेश लंके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.