पाचेगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत मंजूर असलेल्या नेवासा तालुक्यातील पाचेगाव-कारवाडी रस्त्यावरील सव्वातीन लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधकामानंतर आठच दिवसात या पुलाच्या मुख्य भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
एप्रिल महिन्यात या कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासूनच कामाबाबत अनेक तक्रारी बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या; मात्र या तक्रारीचा फारसा उपयोग झाला नाही. स्थानिक जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनी या कामात लक्ष घालून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, अशीही मागणी गेल्या महिन्यात स्थानिकांनी केली होती. त्याबाबतीतही काहीच पावले उचलली गेली नाहीत.
बांधकाम पूर्ण होऊन आठ दिवस उलटत नाहीत तोच काँक्रीट पिचिंग खचले आहे. पूर्वेच्या बाजूला असणाऱ्या साईड भिंतीला तडे गेले असून पुलाची दिशाही बदलली आहे. पुलाचे सर्वच बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
---
पुलाच्या कामाची पाहणी केली असून पुलाच्या एका बाजूच्या मुख्य भिंतीला तडा गेला आहे. जोपर्यंत काम पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत ठेकेदाराला कोणतीही रक्कम अदा करणार नाही.
-संजय घुले,
उपअभियंता,
बांधकाम विभाग, नेवासा
--
दोन फोटो
१८ पाचेगाव, पाचेगाव१
पाचेगाव-कारवाडी रस्त्यावरील पुलाच्या भिंतीला अल्पावधीतच गेलेले तडे.