श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील मडकेवाडी प्राथमिक शाळा इमारत दुरुस्तीचे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रेंगाळले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना पत्र दिले. त्यांनी तातडीने उपठेकेदार बदलण्याची कारवाई केली आहे.
त्यामुळे सहा महिन्यांपासून रेंगाळत पडलेले काम अवघ्या दोन दिवसांत सुरू झाले आहे. आठ दिवसांपूर्वी मडकेवाडी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची बैठक झाली होती. ठेकेदाराने कामात जो हलगर्जीपणा चालविल्याचे निदर्शनास आले, त्यावर नाराजी व्यक्त केली होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना ठेकेदार बदलण्याचे आदेश केले. त्यावर प्रशांत काळे यांनी संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली आणि त्यावर नगर येथील ठेकेदार सुंबे यांनी लेखी खुलासा केला. एक महिन्यात काम करणार असल्याचे सांगितले आणि उपठेकेदारामार्फत बंद पडलेले कामही सुरू केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी एका निवेदनाची दखल घेऊन मडकेवाडी शाळा इमारत दुरुस्तीचे काम अवघ्या दोन दिवसांत सुरू झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
फोटो : १० मडकेवाडी शाळा
बंद असलेले मडकेवाडी शाळेचे काम पुन्हा सुरू झाले आहे.