श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोड बोगदा व धरणांची साठवण क्षमता वाढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. बोगद्याबाबत सर्वांची मते जाणून घ्या, तांत्रिक बाबी तपासा अशा सूचना प्रशासनाला देऊन लवकरच पुन्हा याबाबत बैठक घेऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, आमदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, आमदार संजय शिंदे, आमदार अशोक पवार, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आदी उपस्थित होते. या बैठकीस आमदार बबनराव पाचपुते यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ते आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.
बैठकीच्या सुरुवातीलाच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांनी डिंभे-माणिकडोह बोगद्यासंदर्भात माहिती मांडली. त्यानंतर या योजनेवर पूर्ण अभ्यास झाला आहे. शरद पवार यांनी आदेश द्यावेत. त्यानुसार जलसंपदा कार्यवाही करेल, असे असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. त्यावर शरद पवार यांनी बोगद्यासंदर्भात अडचणीच्या तांत्रिक बाबी तपासून घ्याव्यात. तसेच याबाबत सर्वांची मतेही जाणून घ्यावीत. त्यानंतर पुढील बैठकीत याबाबतचा निर्णय घेऊ, असे सांगितले.
या प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सकारात्मक भूमिका आहे. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार हे मंत्री दिलीप वळसे यांची कशी मनधरणी करतात. याकडे लक्ष लागले आहे.
---
भोस, नाहाटा यांना चेकमेट..
मागील आठवड्यात बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन डिंभेे-माणिकडोड बोगद्याबाबत निवेदन दिले होते. त्यावर पवार यांनी बैठक घेण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यावेळी नाहाटांनी पुढील बैठकीस माजी आमदार राहुल जगताप यांनाही बोलवा, असे सुचविले होते. मात्र त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीस नाहाटा, भोस यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यातच गेल्या काही दिवसांपासून घनश्याम शेलार व बाळासाहेब नाहाटा यांच्यात राजकीय जुगलबंदी झडत आहे. त्यामुळे कुरघोडीच्या राजकारणातूनच नाहाटा, भोस यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीपासून दूर ठेवत चेकमेट दिल्याची चर्चा सुरू आहे.