अहमदनगर : भरपूर पाऊस पडू दे....दुष्काळाचे संकट कायम दूर होऊ दे... देशात एकात्मता आणि शांतता नांदू दे.. अशी शहर ए खतीब मौलाना सईद अहमद यांनी अल्लाहकडे दुआ मागितली आणि हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’चा शुभेच्छांचा वर्षाव झाला. ईदनिमित्त शहरात उत्साह व आनंदाचे वातावरण होते.रमजान ईदनिमित्त कोठला भागातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. त्यापूर्वी शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठण झाले. मौलाना सईद अहमद यांचे धार्मिक प्रवचन झाले. त्यानंतर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना यांनी अल्लाकडे सर्वांच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना केली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांनी भिक्षेकऱ्यांना जकात अदा केली. मैदान व मुख्य रस्त्यावर मुस्लीम बांधवांची गर्दी झाली होती. यावेळी शांतता समितीच्यावतीने मुस्लीम बांधवांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, उबेद शेख, अविनाश घुले यांच्यासह विविध धर्माचे गुरू, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. इदगाह मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन केले. (प्रतिनिधी)
भरपूर पाऊस पडू दे!
By admin | Updated: July 7, 2016 23:26 IST