देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील शिंदे मळ्यात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू असून त्यापैकी एका बिबट्याला गुरुवारी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
हिंगणी, राजापूर या घोड नदी काठच्या गावात ऊस क्षेत्र जास्त असल्याने बिबट्यांचा मुक्तसंचार वाढला आहे. यापूर्वी राजापूरमध्ये वनविभागाने ३ बिबटे पकडले होते. आता शिंदे मळ्यात चार बिबटे एकत्र फिरताना सार्थक वाखारे, अमोल अवचिते, सदाशिव वाखारे, संतोष वाखारे यांनी पाहिले होते.
तसेच याच परिसरात रावसाहेब चोरमले यांची शेळी व अशोक शिंदे यांच्या कोकराचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनकर्मचारी हनुमंत रणदिवे यांनी दोन दिवसांपूर्वी ज्ञानदेव वाखारे यांच्या शेतात पिंजरा लावला. यासाठी तुकाराम शिंदे, राजू शिंदे, कल्पेश वाखारे, विजय शिंदे यांनी सहकार्य केले.
गुरुवारी पहाटे हा ११ महिने वयाचा नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला. सकाळी गोविंद वाखारे व विठ्ठल वाखारे यांनी पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे पाहिले. त्यानंतर अनेकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर वनकर्मचारी हनुमंत रणदिवे, कचरू शेख, भरत पवार हे तत्काळ पिंजऱ्या जवळ पोहचून त्यास बेलवंडी येथील विश्रामगृहात नेले. तेथे त्याच्यावर उपचार केले. वरिष्ठांच्या आदेशाने त्याची रवानगी बिबट निवारण केंद्रात केली जाणार असल्याचे हनुमंत रणदिवे यांनी सांगितले.
---
फोटो पॅलेटमध्ये आहे.