अहमदनगर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून भिस्तबाग महालाजवळ ग्रीन सिटी या एक हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाचा शनिवारी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या प्रकल्पामुळे भिस्तबाग महाल परिसर, तपोवन रोडवर हिरवाईने बहरणार आहे.
शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, इटन कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक राजेश पेवाल, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका मीना चव्हाण, उद्योजक मोहन मानधना, प्रा. माणिकराव विधाते, बाळासाहेब पवार, उद्यान प्रमुख मेहर लहारे, विजय भोसले, सुनील डोंगरे, सचिन भदरगे, संकेत शिंगटे, पराग कानडे, पराग मानधना, रंजना उकिरडे, हेमलाता कांबळे, किसन कसबे, राहुल कसबे, सतीश ढवण, किशोर सुतार, स्वप्निल ढवण, नम्रता शिंगोटे, स्वामी कालेकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार जगताप म्हणाले, समाजामध्ये पर्यावरणाचे महत्त्व पटल्यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहत आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेता संपत बारस्कर नागरिकांमध्ये वृक्षारोपणाबाबत जनजागृती करत आहेत. एमआयडीसीतील इटन इंडिया फाउंडेशन व कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षित संस्थेने बारस्कर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून शहरांमध्ये सुमारे ५ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे हरित नगर ही संकल्पना आता सत्यात उतरणार आहे.
संपत बारस्कर म्हणाले, सावेडी भागात १ हजार वृक्ष लागवडीचा ‘ग्रीन सिटी’ प्रकल्पाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये १० ते १२ फुटाच्या वृक्षासह ट्रीगार्ड लावण्यात येणार आहे. एक वर्षाची संगोपनाची जबाबदारी फाउंडेशने घेतली आहे. प्रास्ताविक डॉ. सागर बोरुडे यांनी केले. नगरसेविका मीना चव्हाण यांनी आभार मानले.
-------------
फोटो- ११ ग्रीन सिटी
महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून नगर येथील भिस्तबाग महाल परिसरात १ हजार झाडे लावण्याचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी बाबासाहेब वाकळे, अविनाश घुले आदी.