अहमदनगर : रेल्वेस्थानकांवर प्लास्टिकच्या कपाऐवजी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र रेल्वेला याबाबतचे आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर कागदी कपातून चहा मिळत आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वेस्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय. २००४ ते २००९ दरम्यान यूपीएच्या काळात लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा रेल्वेस्टेशनवर कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. मात्र, त्यांचे मंत्रिपद जाताच हा उपक्रम बंद पडला व पुन्हा कागदाच्या, तसेच प्लास्टिकच्या कपातून चहा देण्यात येऊ लागला.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत नगर जिल्ह्यातून दौंड-मनमाड हा रेल्वे मार्ग जातो. याअंतर्गत जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २३ रेल्वेस्थानके आहेत. यातील अहमदनगर व शिर्डी हीच दोन मोठी स्थानके आहेत. या ठिकाणी रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या ठेकेदाराकडून चहा किंवा खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. इतर रेल्वेस्थानकावर मात्र हात विक्रीतून चहा किंवा खाद्य पदार्थ मिळतात. या सर्व रेल्वेस्थानकांवर दररोज सुमारे सात ते आठ हजार कप चहाची विक्री होते. लॉकडाऊननंतर ही संख्या काहीशी कमी झाली आहे.
--------------
कुंभारांना मिळेल रोजगार
अजून तरी जिल्ह्यात ‘कुल्हड’मधून चहा मिळण्यास सुरुवात झालेली नाही. मात्र, प्रत्यक्ष याची अंमलबजावणी झाल्यानंतर ‘कुल्हड’ बनविणाऱ्या स्थानिक कुंभारांना रोजगार मिळेल. ‘कुल्हड’ वापरून फेकून दिले जातात. सध्या एक कुल्हड दीड ते अडीच रुपयांदरम्यान मिळते. यामुळे चहाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे एका चहा विक्रेत्याने सांगितले.
-------------
कुल्हडमधून चहा देणे विक्रेत्यांसाठी गैरसोयीचे आहे. एक तर ते कागदी कपापेक्षा महाग असते आणि दुसरी गोष्ट सांभाळण्यासाठी जिकिरीचे असल्याने कुल्हडमधून चहा देणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका आहे.
- चहा विक्रेता