विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पॅनलच्या वतीने पाच वर्षांत गावच्या विकासासाठी काय उपाययोजना करणार याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करून आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.
माजी सरपंच व उमेदवार ॲड. संपत इधाटे यांनी ते सरपंच असलेल्या २००९ ते २०१४ या काळात गावात केलेल्या विकासकामांची यादी मतदारांसमोर मांडली आहे. पुढील पाच वर्षांत गावच्या विकासासाठी काय उपाययोजना करणार याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेश्वर ग्रामविकास मंडळ निवडणुकीत उतरले आहेत. ते स्वत: प्रभाग एकमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या मंडळाच्या विरोधात श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पा आढाव व सरपंच संतोष नरोडे यांनी कोरेश्वर युवा विकास आघाडीचे पॅनल निवडणुकीत उभे केले.
आप्पा आढाव प्रभाग दोनमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही पॅनलचा वचननामा मतदारांसमोर मांडला आहे. दोन्ही मंडळांनी आपआपल्या वचननाम्यात गावातील गरजू लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, वाड्यावस्त्यांचे रस्ते दुरुस्त करून आवश्यक ठिकाणी पूल तयार करणे, शेती सिंचनासाठी बंधारे बांधणे, गावात ग्राम विकासाच्या योजना राबवणे या सारखे एक समान आश्वासने दिली आहेत. यामुळे ही अटीतटीची लढत कोणत्याही पॅनलने जिंकली तरी गावात पुढील पाच वर्षात विकास होईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.