लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यात आरोग्यविभाग व फ्रंटलाईन वर्कर असलेल्या १७०३ डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून पहिल्या व दुसऱ्या टप्यात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. मात्र, १४२ लोकांनी ९ मार्चअखेर लस टोचलेली नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी त्या व्यक्तीने ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. कोपरगाव तालुक्यात २५ जानेवारीला ग्रामीण रुग्णालयात लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्यात आरोग्य विभागाचे सर्व शासकीय व खासगी अधिकारी, कर्मचारी, मेडिकल चालक यांना लस देण्यात आली. यामध्ये सुमारे १३४४ लोकांनी या लसीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी १२७९ लोकांनी ही लस टोचून घेतली आहे. तर दुसऱ्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणाला ५ फेब्रुवारीला सुरवात झाली. यात पंचायत समिती, महसूल विभाग, नगरपरिषद, पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन या विभागातील ५०१ लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यापैकी ४२४ लोकांनी ही लस टोचून घेतली आहे.
विशेष म्हणजे १ मार्चपासून लसीकरणाचा ज्येष्ठ नागरिकांचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. तरीही अद्यापपर्यंत आरोग्य विभागाच्या ६५ लोकांनी व फ्रंटलाईन वर्करच्या ७७ अशा एकूण १४२ लोकांनी अजूनही लस टोचून घेतलेली नाही. लस टोचून न घेणाऱ्यांमध्ये आरोग्य विभागातील काही खासगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, मेडिकल चालक यांचा तर फ्रंटलाईन वर्करमध्ये पंचायत समिती व नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.
...............
पहिल्या व दुसऱ्या टप्यातील नोंदणी केलेल्या जवळपास १४२ लोकांनी अजूनही लस घेतलेली नाही. त्यामध्ये सर्वाधिक पंचायत समिती व नगरपरिषदेच्या लोकांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी बाकी आहेत. त्यांनी लस घेणे महत्वाचे आहे. तसेच ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी नोंदणी करून लवकरात लवकर लस टोचून घ्यावी.
-डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव