कोपरगाव : युती आणि आघाडीत उभी फूट पडल्याचे परिणाम कोपरगाव मतदारसंघात पहावयास मिळत आहेत़ निवडणूक लढविणाचा ठाम निश्चय केलेले कोल्हे व औताडे पक्ष बदलून रिंगणात उतरले आहेत़ बिपीन कोल्हे यांनी मात्र अखेरच्या क्षणी विरोधकांना चकवत भाजपाची उमेदवारी स्रेहलता कोल्हे यांच्यासाठी आणली तर औताडे काँग्रेसचे उमेदवार राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व प्रदेश सचिव संदीप वर्पे यांच्या नावाची चर्चा आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत पहावयास मिळेल़ बिपीन कोल्हे यांनी राष्ट्रवादीकडे आधीच पाठ फिरविली होती़ त्यांनी निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेवून सेनेची उमेदवारी मिळविण्याचाही प्रयत्न केला़ मात्र सेनेने आ़ अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे यांना उमेदवारी जाहीर केली़ त्यामुळे कोल्हे यांचा पक्ष निश्चित नव्हता़ तरीही अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली होती़ त्यातच सेना-भाजपात फूट पडल्याने आयती संधी कोल्हेंकडे चालून आली़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची शुक्रवारी बिपीन व स्नेहलता कोल्हे यांनी भेट घेतली़ या भेटीत कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे कळते़ विकासाच्या मुद्यावर आपण भाजपात जात असून भाजपाची सत्ता येणारच. तेव्हा कोपरगाव तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवू असे नेत्यांनी त्यांना आश्वासन दिल्याचे कळते़ तालुक्याच्या रस्त्यांसाठी केंद्र शासनाचा भरघोस निधी देवू असेही गडकरी यांनी कोल्हे यांना सांगितल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़ मात्र बिपीन कोल्हे यांनी आखणी एक धक्का देत भाजपाची उमेदवारी स्रेहलता कोल्हे यांच्यासाठी आणली आहे. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना घाम फोडणाऱ्या नितीन औताडे यांची दखल काँग्रेस पक्षाला घ्यावी लागली़ काँग्रेसने औताडे यांना उमेदवारी देऊ केली आहे़ कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, परजणे यांची मदत त्यांना होणार आहे़ या शिवाय काँग्रेसचा पारंपरिक मतदारही आहे़ त्या जोरावर औताडे काँग्रेसचे उमेदवार राहणार आहेत़कोल्हे यांनी पाठ फिरविल्याने राष्ट्रवादी पोरकी झाली, असा कयास बांधला जात होता़ पक्षाने मंगेश पाटील किंवा संदीप वर्पे यांच्या नावाची चर्चा सुरु करुन त्यावर उत्तरही शोधले होते. याबाबत वर्पे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगावमध्ये उमेदवार उभा करणार आहे़ त्याची घोषणा उद्या होईल़ मात्र त्याचा उमेदवार मीच असेल, हे आज सांगता येणार नाही़ (प्रतिनिधी)
कोल्हे भाजपात, औताडे काँग्रेसमध्ये
By admin | Updated: September 27, 2014 00:14 IST