शिर्डी : शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंधरा वर्षांपूर्वी हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. हा रखडलेला प्रकल्प मार्गी लावावा तसेच शिर्डीच्या विकासाला गती देण्यासाठी साईसंस्थान विश्वस्त मंडळाची नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
रमेश गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पटेल यांची भेट घेतली. यावेळी अमित शेळके, संदीप सोनवणे, नीलेश कोते, सुधाकर शिंदे, बाबासाहेब कोते, दीपक गोंदकर, शयाद सय्यद, राहुल कुलकर्णी, अमोल बानाइत आदी उपस्थित होते. शरद पवार यांनी २००६ साली साई मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यादृष्टीने त्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून हा महत्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाला चालना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
याशिवाय गेल्या काही वर्षांपासून राजकीय इच्छाशक्ती नसल्याने शिर्डीचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. शिर्डीत मनोरंजनाची साधने नसल्याने भाविकांचे वास्तव्य कमी होऊन अर्थकारणाला ‘ब्रेक’ बसला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नेमणूक होणे गरजेचे आहे. शिर्डी विमानतळावर विमानांचे नाईट लँडिंग सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच राज्य सरकार व संस्थानच्या मदतीने ‘एम्स’च्या धर्तीवर येथे सुसज्ज रूग्णालय उभारण्याची मागणी पटेल यांच्याकडे करण्यात आली.