कर्जत :
कर्जत पोलिसांचा सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नुकताच गौरव केला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पोलीस पथकाचा ‘बेस्ट डिटेक्शन’ म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात पार पडला.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक गुन्ह्यांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही तासांमध्येच तपास केला. अनेक आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहीजळगाव, निंबोडी, बुवासाहेबनगर, कर्जत येथे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासकामाचे विशेष कौतुक होत आहे. यामध्ये माहीजळगाव येथील दरोड्याचा गुन्हा ४८ तासांच्या आत उघडकीस आणून चोरीस गेलेले सोने व रोकड जवळपास सर्व ऐवज हस्तगत केला. शिवाय, गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. तालुक्यातील निंबोडी येथे शेळ्या चोरीसाठी आलेल्या तीन चोरट्यांनी झटापटीत शेतकऱ्यांवर गोळीबार करून त्यांना जखमी करत पोबारा केला होता. त्या गुन्ह्याचा तपास लावत संबंधित गुन्हेगाराला परजिल्ह्यातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
चंद्रशेखर यादव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रबोध हंचे, पोलीस नाईक पांडुरंग भांडवलकर, किरण साळुंके, शाम जाधव, सुनील खैरे, महादेव कोहक, गोवर्धन कदम, शाहूराज तिकटे, गणेश आघाव, रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे, अमित बरडे, ईश्वर माने, सचिन वारे, संतोष फुंदे, उद्धव दिंडे, महिला कोमल गोफने आदींना गौरविण्यात आले.
---
१८ कर्जत पोलीस
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या सहकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला.