अहमदनगर : राजकारणात महत्त्वाकांक्षा असाव्यात. कोण कधी कुठे असेल ते सांगता येत नाही. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी अपेक्षा बाळगणे राजकारणात चुकीचे नाही. महापौरपदाची खुर्ची काटेरी आहे. काम करण्यासाठी वर्षभराचा कालावधी कमी मिळाला, मात्र केलेल्या कामात समाधानी आहे. स्वप्न खूप होते, मात्र त्याला मर्यादाही आल्या. महापौर झाल्यानंतर खूप काही शिकायला मिळाले, अशी प्रांजळ कबुली मावळते महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकारांना दिली. महापौर अभिषेक कळमकर यांचा महापौरपदाचा कार्यकाळ गुरुवारी (दि.३०) संपला. या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. ‘तुम्ही मुख्यमंत्री होणार, तर त्यासाठी आधी आमदार व्हावे लागेल’, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘आमदार होण्यासाठी फक्त अहमदनगर शहर हाच एकमेव मतदारसंघ नाही. जिल्ह्यात १२ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. शिवाय मतदारसंघ नसतानाही आमदार होता येते.’ राजकारण प्रवेशाचा किस्सा हळूवारपणे उलगडत कळमकर यांनी थेट शहराच्या समस्यांवर भाष्य केले. खड्डेमुक्त शहर करण्याचा पहिल्यांदा निर्धार केला. एकही खड्डा शहरात राहिला नाही पाहिजे, असा पहिल्याच दिवशी संकल्प केला. मात्र हा निर्णय आमलात आणताना खूप अडथळे आले. महापौरपदाची खुर्ची जेवढी मानाची असते, तेवढीच ती काटेरी होती, याचा अनुभव मिळाला. महापालिकेची आर्थिक स्थिती, विरोधकांची टीका आणि अकार्यक्षम प्रशासन या गोष्टींमुळे खड्डेमुक्त शहर करण्यात अडचणी निर्माण झाल्या. आढावा बैठकांमधून शहराचे प्रश्न समजले. मात्र आढावा बैठकांमधून काहीच निष्पन्न होत नसल्याचेही दिसले. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांशी थेट संवाद साधता आला. त्यातूनही शहराच्या गरजा कळत गेल्या. चांगल्या कामासाठी कमी कार्यकाळ मिळाला, याची खंत वाटते. विकास कामे करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागला. मात्र दादा कळमकर, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांचे मार्गदर्शन असल्यामुळे काम करणे सोपे गेले. विरोधकांना सोबत घेवून कामे केली. घरकुल योजनेमुळे बेघरांच्या चेहऱ्यावर हसू फुलविता आले, याचे मोठे समाधान आहे. हे काम माझ्या हातून झाले, याचे समाधान आहे. मूलभूत विकास कामांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी संघर्ष करून मिळविता आला, ही माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. शहरात २५ वर्षात आमदार निधी खर्च झाला नाही, म्हणून विकास झाला नाही.(प्रतिनिधी)अमरधाममधील सुविधांचे कार्यारंभ आदेश नसताना उद्घाटन झाले. मात्र तो कार्यारंभ आदेश लगेच दुपारी दिला. यापूर्वी अशी कामे झाली नव्हती का? कार्यारंभ आदेश नसताना काम सुरू झाले हे काही पहिल्यांदा घडले नाही. मात्र विरोधकांनी त्याचेही राजकारण केले. कायदेशीरपणे कार्यवाही झाली पाहिजे, मात्र अमरधाममध्ये सुविधा देणे महत्त्वाचे आहे. फेज टुशी संबंधित अनेक कामे मार्गी लावली. मात्र फेज टू योजनेचा ठेकेदार बदलल्याशिवाय ही योजना चांगल्या पद्धतीने मार्गी लागणार नाही. शास्तीमाफीच्या निर्णयातही खोडा घातला, यासारखे दुर्दैव नाही. प्रभागापुरता विचार करणारे नगरसेवक असल्याने शहराचा विकास मागे पडला आहे. चांगल्या निर्णयात खोळंबा आणणे एवढेच विरोधक काम करतात.महापौर होण्यासाठी मोठा घोडेबाजार करावा लागतो, हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी कोणी तयार नव्हता. त्यामुळे पक्षाने उमेदवार दिला नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय श्रेष्ठींचा होता आणि त्यामध्ये आम्हाला संकोच वाटला नाही. राष्ट्रवादीने निवडणूक लढविली नाही, त्यामुळे पराभव झाला असे म्हणणे किंवा सत्ता हातून गेली, असे म्हणणे गैर आहे.एक वर्षाचा कालावधी असल्याने मला वेळ देता आला नाही, अन्यथा एका एका अधिकारी व कर्मचाऱ्याच्या मागे लागलो असतो. प्रशासनाने सहकार्य केले, मात्र ते अधिक सक्षम बनवावे लागेल. अधिकारी निष्क्रिय आहेत. आर्थिक स्त्रोत संपुष्टात आलेले आहेत. स्वप्न खूप पाहिले, मात्र त्यावर अडचणींच्या मर्यादा होत्या. विलास ढगे हे सक्षम व धाडसी आयुक्त होते. तीन आयुक्त पाहणारा मी पहिला महापौर आहे. स्वीय सहायक लाचखोर निघाला, हे वाईट घडले. मात्र ज्यांना उभे केले, त्यांनी जाणीव ठेवली नाही, याची सल मनात आहे. पक्षाने मला काम करताना स्वातंत्र्य दिले. कोणाचाही दबाव नव्हता.
कळमकर यांना व्हायचेय मुख्यमंत्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:31 IST