अहमदनगर: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पाथर्डी येथे झालेल्या जिल्हा महामंडळाच्या सभेत विजय काकडे यांनी संघटना विरोधी वर्तन केल्याने राज्यसंघाच्या अनुमतीने त्यांची शिक्षक संघातून हाकलपट्टी करण्यात येत असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे यांनी दिली आहे. पत्रकात म्हटले आहे, काकडे यांनी अन्य संघटनांच्या ओरोस येथील अधिवेशनास उपस्थिती लावलेली आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी फ्लेक्स बोर्डवर शिक्षकांना केलेले होते. बँकेच्या गैरकारभाराकडेही ते जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. काकडे हे गत तीन वर्षांपासून शिक्षक संघाचे सभासदच नाहीत. सभासद नसल्याने व त्यांनी संघटनेसोबत विश्वासघात केल्याने संघटनेत आपणाला थारा मिळणार नाही याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांना अंधारात ठेऊन ऐक्य मंडळाची स्वत:च्या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली आहे. असे करताना त्यांनी का.भा. मिसाळ यांसह सर्वांची फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता मंडळ हे बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनल म्हणून वापरतात. मात्र या मंडळाचे आपणच अनभिषिक्त सम्राट आहोत, असे समजून त्यांनी त्याची नोंदणी केली आहे. काकडे यांचा या मंडळाशी व शिक्षक संघाशी काहीही संबंध नाही, असेही संघाचे नेते सर्जेराव राऊत, कल्याण लवांडे, रामराव ढाकणे, विष्णू बांगर, बाळासाहेब कदम यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी) मीच राजीनामा दिलाय : काकडे शिक्षक संघाचा मी स्वत:च रविवारी पाथर्डी येथे राजीनामा दिला असून निषेध करुनच तेथील मेळाव्यातून बाहेर पडलो आहे. तेव्हा हाकलपट्टीचा प्रश्न येतोच कोठे. ऐक्य मंडळाचा व शिक्षक संघाचा काहीही संबंध नाही. ऐक्य मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना विश्वासात घेऊनच त्याची नोंदणी केली आहे. त्यामुळे यात कोणाची फसवणूक केल्याचा प्रश्नच नाही, असे सांगत विजय काकडे यांनी शिक्षक संघाच्या आरोपांचे खंडण केले आहे. ऐक्य मंडळाची आपण बांधणी करणार असल्याचेही ते म्हणाले.
काकडे यांची शिक्षक संघातून हकालपट्टी
By admin | Updated: July 29, 2014 01:03 IST