मिरी/करंजी : गेल्या दोन पिढ्यांपासून वादात सापडलेल्या मिरी (ता. पाथर्डी) येथील ग्रामदैवत कानिफनाथ देवस्थानचा वाद अवघ्या दोन तासात मिटला़ आणि मंदिर जीर्णोद्धाराचा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला़ मिरी येथे सुमारे साडेतीनशे वर्षांपुर्वीचे कानिफनाथांचे हेमाडपंथी देवस्थान आहे. या ठिकाणी मुख्य गाभाऱ्यात एक दर्गासुद्धा आहे. येथील पुजापाठ मुजावर-इनामदार हे करीत आहेत. मात्र देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्याची मोठी दुरावस्था झाली आहे. ते जिर्ण झाले आहे. म्हणून ग्रामस्थांनी येथे भव्य व आकर्षक मंदिर उभारण्याचा प्रस्ताव या देवस्थानचे विश्वस्त व पुजा-देखभाल करणाऱ्यांकडे मांडला. याबाबत सरपंच मिना मिरपगार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ग्रामसभा बोलविण्यात आली. या ग्रामसभेला हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. कानिफनाथ देवस्थानचा जिर्णोद्धार करण्यासाठी या ठिकाणी संगमरवरी दगडाचे भव्य व आकर्षक मंदिर उभारणे, मंदिरावर आकर्षक कळस व घुमट उभारणे, मंदिरावर शांततेचे प्रतिक असलेला पांढऱ्या रंगाचा झेंडा उभारणे आदी निर्णय ग्रामसभेत घेण्यात आले़ग्रामसभेच्या माध्यमातून सार्वजनिक ट्रस्ट स्थापन केले जाणार आहे. पुर्वीच्या ज्या न्यायप्रविष्ठ अडचणी आहेत त्या सुद्धा सामंजस्याने सोडविल्या जाणार असल्याचा निर्णय दोन्ही समाजाच्या वतीने घेण्यात आला़ कानिफनाथांचे भव्य व आकर्षक मंदिर उभारणीचा निर्णय जाहीर होताच हिंदु-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगण देत आनंदोत्सव साजरा केला. सोमवारी झालेल्या ग्रामसभेसाठी राजू इनामदार, खलील पटेल, आयूब इनामदार, जलील इनामदार, उपसरपंच भुजंगराव गवळी, डॉ़ बबनराव नरसाळे, ग्रामसेवक डी. एच. घुमरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरी येथील कानिफनाथांच्या यात्रा उत्सवानिमित्त हजारो भाविक नाशिक, पुणे, मराठवाड्यातून येथे दर्शनासाठी येतात. मढी यात्रा आणि मिरी येथील कानिफनाथांचा यात्राउत्सव एकाचवेळी सुरु होतो. बहुतांश भााविक अगोदर मिरी येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी येतात व नंतर पुढे मढीच्या कानिफनाथाच्या दर्शनासाठी रवाना होतात. (वार्ताहर)
दोन पिढ्यांचा वाद मिटला
By admin | Updated: June 10, 2014 00:14 IST