अहमदनगर : शहरातील स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या; परंतु वेळोवेळी मुदतवाढ देऊनही डेमो न दिल्यामुळे ईस्मार्ट कंपनीची निविदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आता एकमेव क्युबेक्स कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. अंतिम मंजुरीसाठी निविदा छाननी समितीसमोर पाठविली जाणार आहे.
शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचा खर्च महापालिकेला पेलवत नाही. त्यामुळे दिवाबत्तीचा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर’ या तत्त्वावर देण्याचा निर्णय महासभेने घेतला. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याची घोषणा केली होती. विद्युत विभागाकडून स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी निविदा मागविल्या गेल्या; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली. त्यास प्रतिसाद मिळाला. प्रकल्पासाठी क्युबेक्स आणि ईस्मार्ट या दोन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. तांत्रिक लिफाफे उघडून या दोन्ही कंपन्यांना प्रयोगिक तत्त्वावर ८ एलईडी लावण्यास सांगण्यात आले होते. यामुळे किती विजेची बचत होते, याची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचेही ठरले होते; परंतु ईस्मार्ट कंपनीने दिलेल्या मुदतीत डेमो दिला नाही. आयुक्त शंकर गोरे यांनी संबंधित कंपनीला दोन दिवसांची मुदत दिली होती; परंतु या कंपनीने डेमो न दिल्याने ईस्मार्ट कंपनीची निविदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एकमेव क्युबेक्स कंपनीची निविदा पात्र ठरली असून, या कंपनीची निविदा अंतिम मंजुरीसाठी छाननी समितीसमोर सादर केली जाणार आहे.
......
स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठीही स्पर्धा नाहीच
शहरातील महत्त्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर घेण्यासाठी स्पर्धा होणे अपेक्षित होते; परंतु तीनवेळा निविदा प्रसिद्ध करूनदेखील प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यावेळी दोन निविदा प्राप्त झाल्या. त्याही एका कंपनीने डेमो दिला नाही. त्यामुळे एकमेव निविदा पात्र ठरली आहे.