अहमदनगर : जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने बदलून येणाऱ्या शिक्षकांचा आकडा दीड हजारांच्या पुढे गेला आहे. यामुळे या शिक्षकांचे काय करावे, असा प्रश्न प्राथमिक शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या १५ दिवसांत जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजनानंतर रिक्त जागांचे चित्र स्पष्ट होणार आहे.गेल्या पाच ते सहा वर्षापासून नगर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने बदलून येणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न गाजत आहे. दिवसेंदिवस या शिक्षकांची यादी वाढत चालली आहे. सध्या दीड हजारहून अधिक शिक्षकांची जिल्ह्यात बदलून यादी तयार आहे. दुसरीकडे पद्वीधर पदोन्नतीतून जिल्ह्यात अवघ्या ६७ जागा रिक्त झाल्या असून तालुकास्तर आणि जिल्हा स्तरावर शिक्षकांच्या समायोजनानंतर २५० च्या जवळपास जागा रिक्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या ठिकाणी सरळसेवा भरती करावी की आंतरजिल्हा शिक्षकांना या ठिकाणी समावून घेण्यात यावे, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनापुढे आहे. जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या जागांचा अंतिम तपशील मिळाल्यावर शिक्षण विभाग राज्य सरकारला याबाबत माहिती देणार आहेत. त्यानंतर सरकारने सरळ सेवा भरती किंवा आंतरजिल्हा याबाबत परवानगी दिल्यावर ती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.जिल्हा परिषदेत सध्या आंतरजिल्हा शिक्षकांची बदली हा एकमेव विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा बनला आहे. काही जिल्हा परिषद पदाधिकारी सदस्यांना आंतरजिल्हा शिक्षकांना प्राधान्य मिळावे, असे वाटत आहे. तर काहींना सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. मात्र, हे दोन्ही पर्याय धोरणात्मक असल्याने त्यावर पदाधिकारी आणि प्रशासन यांना एकत्र बसून धोरण ठरवावे लागणार आहे.
आंतरजिल्हा शिक्षकांचा तिढा कायम
By admin | Updated: August 12, 2014 23:18 IST