अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पहिलीत नव्याने ४८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ३० जूनच्या अहवालानुसार ही आकडेवारी दिलेली आहे. या वर्षी पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता विकास वाढीसाठी २१ कलमी दीपस्तंभ कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील जाणकारांशी सल्लामसलत करून दीपस्तंभ उपक्रमाची निर्मिती केली आहे. यात प्रत्येक शाळेच्या इमारतीस रंग देणे, पिण्याच्या पाण्याची टाकी व स्वच्छतागृहाची स्वच्छता, क्रीडांगण व खेळाचे साहित्य उपलब्ध करणे, शाळेच्या भिंती बोलक्या करणे, शाळेत बागेची निर्मिती करणे यासह शैक्षणिक दर्जा वाढीसोबतच विद्यार्थ्यांना आवडेल अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करण्यात येणार आहे.जिल्ह्यात सध्या या उपक्रमानुसार अध्यापन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे. यंदा एकीकडे शाळेतील पट संख्या कमी होत असतांना पहिलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झाल्याने शिक्षकांसाठी ही चांगली बातमी आहे. गत वर्षी ३० सप्टेंबरला ५८ हजार विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्याचा अहवाल तयार झाला होता. यंदा शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ दिवसांत ४८ हजार विद्यार्थी दाखल झालेले आहेत. सप्टेंबर पर्यंत मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आहे. (प्रतिनिधी)पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांत पाच वर्षापेक्षा जास्त वय असणारे ३४ हजार ६०४ विद्यार्थी असून सहा वर्षापुढील १३ हजार ६८ विद्यार्थी आहेत. यंदा गेल्या दोन वर्षापासून शाळेचे तोंड न पाहणाऱ्या सात तर सलग एक महिना गैरहजर असणाऱ्या १८ हजार ३३३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. पूर्वी जुलै अखेरपर्यंत शाळेत प्रवेश देण्यात येत होता. यंदापासून बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा लागू झाला असून वर्षभरात कधीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेता येणार आहे.
पहिलीत ४८ हजार विद्यार्थी दाखल
By admin | Updated: July 18, 2014 01:39 IST