अहमदनगर : शहरातील मुळ गावासह वाढीव हद्दीचा जीआयस प्रणालीव्दारे विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राप्त झालेल्या निविदांवर येत्या सोमवारी होणार्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा होणार आहे. भौगोलिक माहितीच्या अधारे हा आराखडा तयार करण्यात येणार असून, एका क्लिकवर शहराची माहिती उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अमृत मिशन कार्यक्रमात नगर शहराची निवड करण्यात आलेली आहे. अमृत मिशन कार्यक्रमासाठी निवड झालेल्या शहरांचा सुधारीत विकास आराखडा २०२२ पर्यंत तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाने आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. या कामासाठी अक्षय इंजिनियर्स व दिंडोरी येथील शाम अरोटे अशा दोन निविदा प्राप्त झालेल्या आहेत. सदर निविदा अंतिम मंजूरीसाठी स्थायी समितीसमोर आहेत.
महापालिकेच्या विकास योजनेला २०२२ मध्ये १७ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वी शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. महापालकेचे वाढीव हद्दीसह ८ हजार २१ हेक्टर इतकी क्षेत्रफळ आहे. मुळ शहराचे क्षेत्रफळ १९. ८४ चौरस किलाेमीटर इतके आहे. यामध्ये शहर गावठाण, सावेडी, नालेगाव, केडगाव, माळीवाडा, चाहुराणा खुर्द, चाहुराणा बुद्रुक, भिंगार मोरचूदनगरचा समावेश आहे. महापालिका सन २००३ मध्ये स्थापन झाली. सध्याचा विकास आराखडा २००५ मध्ये मंजूर झालेला आहे. हद्दवाढीतील गावांचा आराखडा २०१२ मध्ये अंमलात आला. नवीन तयार करण्यात येणारा आराखडा मुळ गाव व वाढीव हद्दीचा असणार आहे. शहराची झालेली वाढ, लोकसंख्येतील बदल, लोकांच्या गरजा, हे लक्षात घेऊन विकास आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा तयार करण्यासाठी खाजगी संस्थेला ३ वर्षांची मुदत असणार आहे.
..
शहरातील सर्व जागा, मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण
शहातील महापालिकेचे मोकळे भुखंड, रस्ते, चौक आदींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींचे कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाहीत. विकास आराखड्यामुळे ही माहितीही उपलब्ध होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.