जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाली. त्यानंतर पोलीस तपासात अवघ्या दोन दिवसांत बोठे हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी बोठे याच्या घराची तीनवेळा झडती घेतली आहे. शनिवारी पोलिसांनी बारकाईने बोठे याचा बंगला तपासला. यात महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तसेच सात दिवसांपूर्वी त्याचा साथीदार सागर भिंगारदिवे याच्या घराचीही झडती घेतली होती. यावेळी काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. हत्याकांडात नाव निष्पन्न झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. पोलीस गेल्या दहा दिवसांपासून त्याचा शोध घेत आहेत. तो नाशिकमध्ये लपल्याची माहिती होती. मात्र, पोलीस पोहोचण्याआधीच तो तेथून पसार झाला. पोलिसांना बोठे सापडत कसा नाही,असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-----------
बोठे याच्या बँक खात्यावर नजर
गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून बोठे फरार आहे. या दरम्यान त्याने बँकेतून काही व्यवहार केले का, यावरही पोलिसांची नजर आहे. बोठे याला जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर कोण मदत करू शकतो. याबाबतही पोलिसांनी माहिती संकलित करून शोधमोहीम सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच बाेठे जेरबंद होईल, असे पोलीस सांगत आहेत.
----------------------------------------------------------------------------
रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याचा पोलीस सर्वत्र शोध घेत आहेत. या गुन्ह्यात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. बोठे याच्याबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा. याबाबत गोपनीयता बाळगली जाईल.
मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर