अहमदनगर : राज्य शासनाकडून स्पर्धा परीक्षेचे नियोजन सुरू असून, लसीकरणाबाबत अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांना लसीकरण उपलब्ध होत नाही. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्यांचे तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी केली आहे.
कर्डिले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रावर डोस घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. नगर तालुक्यात मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध केंद्रांवर हेलपाटे मारावे लागतात. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी लस उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही. दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसता येईल, अशी अट आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. शासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरणाचे डोस उपलब्ध करून द्यावे, मागणी कर्डिले यांनी केली आहे.