जामखेड: जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील जी गावे प्रभावीपणे काम करतील, त्या गावाची निवड नियमावलीप्रमाणे करून आदर्श गाव निवडले जाईल. जामखेड तालुक्यात जी गावे उत्कृष्ट म्हणून निवडली जातील, त्यांना माझ्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. जामखेड येथे शुक्रवारी आयोजित टंचाई आढावा बैठक व महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानांतर्गत नाला खोलीकरण व सरळीकरण कामातील लोकसहभागाविषयी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांच्या एक दिवसीय कार्यशाळेत राम शिंदे बोलत होते. टंचाई व जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विशेष निधी उपलब्ध करू व येत्या पंधरा दिवसाच्या आत जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी, नगर हे तालुके दुष्काळी जाहीर करून छावण्या चालू केल्या जातील, असे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियानात तालुक्यातील ८७ पैकी ७५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ४१ गावातील कामे पूर्ण झाली असून आता ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे, असे शिंदे म्हणाले.बैठकीस जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, भाजपाचे जामखेड तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, बाजार समितीचे संचालक तुषार पवार, प्रा. महादेव डुचे, सूर्यकांत मोरे, महेश निमोणकर, चित्रागंध वारे, संतोष पवार, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आदर्श गावाला भरीव निधी
By admin | Updated: February 26, 2016 23:43 IST