जिल्ह्यात १ हजार ८५१ होमगार्ड असून यात १५० महिला कार्यरत आहेत. ५० पेक्षा जास्त वय असलेले १४२ होमगार्ड आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ५० पेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डकडून गेल्या वर्षभरापासून सेवा घेतली जात नाही. मात्र जे सेवेत नियमित आहेत त्यांचेही वेळेवर मानधन मिळेना अशी परिस्थिती आहे. सन, उत्सव, बंदोबस्त तसेच विविध आपत्तीत होमगार्ड यांना सेवेसाठी बोलविले जाते. त्यांना प्रतिदिन ६७० रुपये मानधन दिले जाते. कोरोनाकाळ केलेल्या सेवेचे मानधन अनेक होमगार्डसाठी मोठा आर्थिक आधार ठरले आहे. सध्या मात्र फेब्रुवारी ते मे महिन्याचे मानधन रखडले आहे.
-----------------
जगायचे कसे?
होमगार्ड ही नोकरी नसून सेवा आहे. नियमित नोकरी, व्यवसाय करून आम्ही ही सेवा करतात. कोरोनाकाळात मात्र अनेक होमगार्डचा नियमित व्यवसाय व खासगी नोकऱ्या ठप्प झाल्या. आपत्ती काळात पोलीस प्रशासनाकडून सेवेला बोलविल्यानंतर प्रवास व जेवणाचा खर्च आम्हालाच करावा लागतो. त्यामुळे सेवेचे तत्काळ मानधन मिळणे गरजेचे आहे. मानधन रखडल्याने आमच्यासमोर सध्या दुहेरी संकट ओढावले असल्याची प्रतिक्रिया काही होमगार्डस्नी व्यक्त केली.
----------------------
६० टक्के होमगार्डचे लसिकरण
होमगार्डचे प्रभारी केंद्र नायक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ६० टक्के होमगार्डचे कोरोना लसिकरण झाले आहे. १८५१ पैकी ७२९ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत तर ३४५ जणांनी पहिला डोस घेतला आहे. ५० पेक्षा जास्त वय असलेल्या ७३ जणांचे लसिकरण झाले आहे.
--------------------
५० पेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डस् ना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सध्या त्यांची सेवा घेतली जात नाही. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांना नियमित सेवा दिली जाणार आहे. कोरोनाकाळात रोटेशनप्रमाणे इतर होमगार्ड नियमित सेवेत आहेत. आतापर्यंत ६० टक्के पेक्षा जास्त होमगार्डचे लसिकरण झालेले आहे. मानधनाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. येत्या काही दिवसांत माधन वर्ग होईल.
- संजय शिंदे, प्रभारी केंद्र नायक, होमगार्ड विभाग