अपघातानंतर कंटेनरचालक कंटेनर घेऊन पळून जात असताना हा कंटेनर १९ मैल येथे महामार्गाच्या खाली जाऊन उलटला. परराज्यातील कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतीक्षा नामदेव पारधी असे या अपघातात मृत्यू झालेल्या दहा महिन्यांच्या बालिकेचे नाव आहे. पुण्याहून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरची घारगाव परिसरात दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक बसली. यात नामदेव अंकुश पारधी व मंगल नामदेव पारधी (रा. डोळासणे, ता. संगमनेर) हे दाम्पत्य त्यांच्या दहा महिन्यांच्या बालिकेला घारगाव येथून दवाखान्यातून घरी घेऊन जात असताना ते प्रवास करीत असलेल्या दुचाकीला धडक बसली. धडक बसल्याने हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक तरुणांनी त्यांना उपचारार्थ पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर मार लागल्याने बालिकेचा मृत्यू झाला. पुढे काही अंतरावर दुसऱ्या एका दुचाकीला याच कंटेनरची धडक बसली. त्यात दुचाकीवरील नवनाथ सखाराम गाढवे हे गंभीर जखमी झाले, तर शिवाजी रामचंद्र भागवत हे किरकोळ जखमी झाले. हे दोघेही बावपठार, नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर येथील रहिवासी आहेत. त्यांनाही स्थानिक तरुणांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. दोन दुचाकींना कंटेनरची धडक बसल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर घेऊन पळून गेला. पुढे काही किलोमीटर गेल्यानंतर १९ मैलावर हा कंटेनर जाऊन उलटला. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड, राजेंद्र लांघे यांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
१०संगमनेर अपघात