जामखेड : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसअखेर १९ ग्रामपंचायतींसाठी एकूण १३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोमवारी इच्छुकांनी एकूण १२७ उमेदवारी अर्ज दाखल केले. ३० ग्रामपंचायतींसाठी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. सर्वांत जास्त उमेदवारी ३८ अर्ज पिंपरखेड येथून दाखल झाले.
उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस बाकी आहेत. अनेक इच्छुक कागदपत्रे जमा करणे व ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. बुधवारी (दि.२३) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये नान्नज २, पाटोदा २, खर्डा १, दिघोळ ३, पिंपरखेड २ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी झाली होती. ऑनलाइन अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने अडथळा निर्माण होत आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या परिसरात गर्दी झाली होती. सोमवारी १२७ अर्ज दाखल झाले. पिंपरखेड ३६, साकत १२, दिघोळ १२, नान्नज ६, धोंडपारगाव, घोडेगाव, कवडगाव, खुरदैठण प्रत्येकी १, डोणगाव, गुरेवाडी प्रत्येकी २, पाटोदा ९, बांधखडक ४, खर्डा ६, आपटी ७, आनंदवाडी ५, नाहुली, तरडगाव प्रत्येकी ३, चोंडी, धामणगाव प्रत्येकी ८ असे एकूण १२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
३० ग्रामपंचायतींमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
---
सारोळ्यात बिनविरोधसाठी प्रयत्न
मागील पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. तीच परंपरा कायम राहील, अशी शक्यता आहे. शेवटच्या दिवशी मोजकेच उमेदवारी अर्ज दाखल करून ग्रामपंचायत बिनविरोध केली जाणार असल्याचीही चर्चा आहे.
फोटो : २९ जामखेड ग्रामपंचायत
जामखेड तहसील कार्यालयामध्ये दिघोळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना माजी पंचायत समिती सदस्य दशरथ राजगुरू व इतर.