नेवासा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. प्रचारासाठी गावपातळीवर सोशल मीडियाचा वापर होत असून, तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १०१९ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. यात मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार तुकाराम गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या गावातील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यात सोनईत गडाख विरुद्ध गडाख असा संघर्ष होत असल्याने जिल्ह्यातील नेत्यांचेही या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सोनई, कुकाणा, प्रवरासंगम, चांदा, सलाबतपूर, बेलपिंपळगाव, भेंडा बुद्रुक, देवगाव, जेऊरहैबती, तेलकुडगाव, पिंप्रीशहाली या मोठ्या ग्रामपंचायतींसह ५२ गावांत निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. त्यातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकास एक लढत होत आहे. बेलपिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये १३ जागांसाठी ३१ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शनिशिंगणापूर, वांजोळी, खरवंडी, देवसडे, मोरेचिंचोरे, वाटापूर, मंगळापूर या सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायत सदस्य हे मंत्री गडाख यांना मानणारे आहेत. जळके बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अकरा जागांपैकी दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर अवघ्या एका जागेसाठी येथे निवडणूक होत आहे, तर मोठी ग्रामपंचायत असलेल्या भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीचे तेरा सदस्य बिनविरोध निवडून आले असून, या ठिकाणी चार जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीत गडाखांनी विरोधकांना मात दिल्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीत गडाखांचे वर्चस्व असलेल्या गावांमध्ये विरोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. गडाख यांच्याविरोधात माजी खासदार तुकाराम गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
.............
सोनईत गडाख विरुद्ध गडाख
सोनई येथे १७ सदस्य पदांसाठी निवडणूक होत असून, ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीत मंत्री शंकरराव गडाख विरुद्ध माजी खासदार तुकाराम गडाख असे चित्र निर्माण झाले आहे, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगावात १३ जागांसाठी निवडणूक होत असून, ३९ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. मंत्री गडाख गट व माजी आमदार मुरकुटे गट यांच्यात ही निवडणूक होत असून, प्रचारात दोन्ही गटाने कंबर कसली आहे. कुकाणा ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, माजी आमदार पांडुरंग अभंग गट व ॲड. देसाई देशमुख गटाच्या समर्थकांमध्ये ही निवडणूक होत आहे.