कोपरगाव : शहरातील स्टेशन रोडच्या कडेला असलेल्या ऊस तोडणी कामगाराच्या घराला महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या. त्यावर सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कोपरगावातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला कपडे, जीवनावश्यक वस्तूंची तसेच रोख रक्कम प्रत्यक्षात जाऊन देत मदतीचा हात दिला आहे.
घराचे जळीत झालेले इब्राहीम पठाण कुटुंबीय हे मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. २० ते २५ वर्षांपासून कोपरगाव येथे वास्तव्यास आहेत. ऊस कारखान्याच्या गळीत हंगामात ऊस तोडणी करून हे कुटुंब आपल्या प्रपंचाचा गाडा चालवित असते. मात्र, या घटनेने त्यांच्या छोट्याश्या संसाराची राख रांगोळी झाली होती. या कुटुंबाची गरज ओळखून या पठाण कुटुंबाला किमान एक ते दीड महिनाभर पुरेल असे किराणा सामान, गहू, तांदूळ कपडे व रोख रक्कम, घरासाठी पत्रे अशा स्वरूपाची मदत केली आहे.
या उपक्रमात कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज, लोकमतचे उपसंपादक रोहित टेके, पत्रकार मोबिन खान, पत्रकार अनिल दीक्षित, सामाजिक कार्यकर्ते सतीश गुजराथी, मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे, दादा भारूड, अरुण कदम, प्रवीण निळकंठ, अशोक लकारे, शंकर वाणी, कैलास साळवे, भीमा संवत्सरकर यांनी भरीव मदत देऊन सहकार्य केले.
....
ओळी-ऊसतोडणी कामगार कुटुंबाला पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्त्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.