पुणे/अहमदनगर : आंबेगाव, जुन्नर, शिरूरबरोबरच सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् करणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणक्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, डिंभे या ५ धरणांत गेल्या वर्षी ९.१२ टक्के पाणीसाठा होता, तर या वर्षी तो ७.४३ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पुरेसे पाणी मिळाले नाही. कुकडी, मीना, आर, घोड, मांडवी नद्या कोरड्या पडल्या होत्या. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेली शेती व पाणी योजना अडचणीत आल्या होत्या. मात्र, सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जनावरांना चारा, प्यायला पाणी व शेतीला पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या रिमझिम पाऊस पडत असल्याने पेरण्यांनाही वेग आला आहे.कुकडी प्रकल्पात ० टक्का पाणीसाठा झालेल्या ५ धरणांत ३ जुलै रोजी सायंकाळी ६ पर्यंत १.१७ टक्का पाणीसाठा झाला आहे. यातील येडगाव धरणात ३३ मिमी, माणिकडोह ६६ मिमी, वडज ३२ मिमी, पिंपळगाव जोगा ११४ मिमी, डिंभे ७८ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नुर यांनी दिली. नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड हे तालुके कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ऐन उन्हाळ्यात कुकडीचे आवर्तन मिळाल्याने या भागाला दिलासा मिळाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर या तालुक्यांचे भवितव्य अवलंबून असते. वरची धरणे भरल्यास या तालुक्यांनाही आपोआप दिलासा मिळतो. (प्रतिनिधी )
कुकडीच्या पाणी साठ्यात वाढ
By admin | Updated: July 7, 2016 23:23 IST