अहमदनगर : खासगी ठिकाणी ई-निविदा प्रसिद्ध करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सचिव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी तसेच ई-निविदा प्रक्रियेतील नियमावली लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी आंदोलकांकडून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपायुक्त शिंदे यांनी निवेदन स्वीकारून या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली. बैठकीत आजपर्यंत ई-निविदा प्रक्रियाविषयीची सर्व बनवाबनवीची प्रक्रिया शिंदे यांना पटारे यांनी दाखवून दिली. वेगवेगळ्या मनमानी अटी लादून होणाऱ्या निविदा पुराव्यानिशी सादर केल्या. अतिरिक्त सीईओ जगन्नाथ भोर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी शिंदे यांना वेळोवेळी काढलेले कारवाईचे आदेश दाखविले. परंतु, कोणतीही सुधारणा गटविकास अधिकारी यांच्या अधिकारातील ग्रामपंचायतीत होत नाही, म्हणून १४ गटविकास अधिकाऱ्यांसह पुराव्यानिशी तक्रार दाखल केलेल्या ११ ग्रामपंचायतींच्या सचिवांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
यापुढे ई-निविदा प्रक्रिया ही एकाच नियमावलीत संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत प्रसिद्ध केली जाईल आणि शासकीय कार्यालयातच निविदा प्रसिद्ध होतील, असे प्रभारी सीईओ शिंदे यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा सरचिटणीस प्रवीण देवकर, शहराध्यक्ष शरद बोंबले, अमोल वाळुंज, अक्षय पटारे, सुधीर गाढेकर आदींसह छावाचे पदाधिकारी उपस्थित होते.
--------
फोटो - ०२छावा निवेदन
खासगी ठिकाणी ई-निविदा प्रसिद्ध करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सचिव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय छावा युवक संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.