शेवगाव : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक प्रशासनाकडून संक्रमण टाळता यावे, म्हणून लसीकरणावर भर दिला जातो आहे. जिल्हा रुग्णालयासह सर्व तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण राबविले जात आहे, पण या अभियानात दिव्यांगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशासनाने दिव्यांगांच्या लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे.
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या सुरुवातीला फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर, ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात सुरुवात झाली. आता १ मेपासून १८ वर्षांपुढील युवकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, परंतु दिव्यांग बांधवांना यात उपेक्षित ठेवण्यात आले आहे. या अभियानात दिव्यांग बांधवांसाठी कुठलाही विशेष दिवस नाही, विशेष व्यवस्था नाही. दिव्यांगांना लसीकरण आवश्यक आहे. दिव्यांगांना सामान्यांपेक्षा कोरोना संक्रमणाची शक्यता जास्त असते. त्यांना चालताना, उठता-बसताना सहकार्य घ्यावे लागते. त्यामुळे दिव्यांगांना संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे दिव्यांग बांधवांनाही लसीकरण अभियानात सहभागी करून घ्यावे, त्यांच्यासाठी लसीकरणाची स्वतंत्र सोय करण्यात यावी, अशी मागणी सावली दिव्यांग संघटनेने केलेली आहे.
४५ वर्षांवरील दिव्यांगांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ते लसीकरण केंद्रावर येऊ शकत नसेल, तर त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी सावली दिव्यांग संस्थाचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केली आहे.
ज्या संस्था दिव्यांगांसाठी काम करतात, त्यांनी प्रशासनाला दिव्यांगांच्या अवस्थेची जाणीव करून देत, प्रशासनाला लसीकरणासाठी बाध्य करावे, अशीही मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे. सध्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाऊन लस घेणे शक्य नाही. त्यामुळे लसीकरणाचा आठवड्यातील एक दिवस दिव्यांगासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी दिव्यांग संघटनेच्या वतीने पुढे येत आहे.
---------------------
जिल्ह्यात २०११च्या जनगणनेनुसार ३७ ते ३८ हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. शासनाने आठवड्यातील एक दिवस राखीव ठेवून दिव्यांगांचे लसीकरण करावे. अतितीव्र दिव्यांग जे लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकत नाही, अशा बांधवांना घरी लस द्यावी, या मागणीचे निवेदन दिलेले आहे.
- बाबासाहेब महापुरे, राज्य अध्यक्ष, सावली दिव्यांग संघटना.