चांंदेकसारे : पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील चाऱ्या अजून कोरड्याच असल्याचे चित्र आहे. गोदावरी उजवा कालव्याला आवर्तन येऊन सुमारे पंधरा दिवस झाले आहेत. मात्र, लाभक्षेत्रातील चाऱ्यांना अजून पाणी सुटलेले नाही.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, कोकमठाण या परिसराला मिनी कालवा म्हणून हरिसन ब्रँच चारी आहे. पूर्वी गोदावरी कालव्याला पाणी पोहोचल्यानंतर लगेचच या चारीला पाणी सुटायचे. मात्र, यंदा पंधरा दिवस उलटून गेले तरीदेखील ही चारी वाहत नाही. पाटबंधारे खात्याचे अधिकारी गायकवाड व पोळ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चांदेकसारेचे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी संपर्क साधला असता, अजून आठ दिवस चारीला पाणी सुटणार नाही, असे सांगण्यात आले. या परिसरात शेतकऱ्यांचे उभे पीक शेवटच्या घटका मोजत आहे. दोन दिवसात जर शेतीला पाणी मिळाले नाही तर पिकाची वाट लागणार आहे. पण पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काही घेणे-देणे नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.
पोहेगाव परिसरातील नऊ चारी, सत्तावीस चारी, सव्वीस चारी या चाऱ्यांनाही अजून पाणी सुटलेले नाही. सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यातच शेतीला पाणी मिळत नसल्याने आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोनेवाडी, चांदेकसारे परिसरात अजून पिण्याच्या पाण्याचे टँकरदेखील भरलेले नाहीत. मग पंधरा दिवसांपासून गोदावरी कालवा वाहत असताना पाणी जाते कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.