जामखेड : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे. ईद शांततेत साजरी करावी. नमाज सार्वजनिक ईदगाह मैदानावर अदा न करता आपापल्या घरीच अदा करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजातील धर्मगुरू, लोकप्रतिनिधींची शनिवारी सकाळी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी धर्मगुरू मौलाना खलील अहमद, अझरुद्दीन काझी, मुक्तार सय्यद, हुसेन मुल्ला, नगरसेवक शामीर सय्यद, हुसेन मुल्ला, जमीर सय्यद, नासीर सय्यद (गादीवाले) हजर होते.
गायकवाड म्हणाले, समाजातील काही उपद्रवी लोक अफवा पसरवतात. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहे. कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू.
यावेळी मुस्लिम समाजातील धर्मगुरू व लोकप्रतिनिधींनी आम्ही समाजातील सर्व लोकांना शासनाने घातलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगू. कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, अशी ग्वाही दिली.