केंद्र सरकारने एक जानेवारीपासून ‘वन नेशन - वन रेशन’ योजनेची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शिधापत्रिकांचे आधार सीडिंग करण्याची प्रक्रिया गेले तीन महिने सुरू होती. नगर जिल्ह्यातील ९७ टक्के शिधापत्रिका आधारशी लिंक झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला आता जिल्ह्यातील कोणत्याही दुकानावरून धान्य उचलता येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक राज्यात किंवा देशात कुठेही गेला आणि राज्यातील, देशातील कोणत्याही ठिकाणचा नागरिक नगर जिल्ह्यात आला तरी त्याला जिल्ह्यातील कोणत्याही रेशन दुकानावरून धान्य घेता येणार आहे. यावेळी संबंधित लाभार्थ्याकडे केवळ आधार कार्ड किंवा आधार क्रमांक असला तरी त्याला त्याच्या नावावरील धान्य घेता येणार आहे. सध्या ही योजना जनजागृतीच्या स्तरावर आहे. या योजनेची माहिती देणारे पोस्टर्स रेल्वेमध्ये आधीच लावण्यात आले आहेत, तर सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्सद्वारे जागृती करण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले. नागरिकांनी ‘मेरा राशन’ हे ऑप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यायचे आहे. या ॲपमध्ये रेशनकार्डाची, मिळणाऱ्या धान्याची, दुकानांची माहिती व लोकेशन मिळणार आहे.
-------------
दोन परप्रांतीयांनी घेतला लाभ
नगर जिल्ह्यात निवास करीत असलेल्या परप्रांतीय कामगार, मजुरांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आलेल्या दोन बिहारी कामगारांनी या योजनेचा सर्वात प्रथम लाभ घेतला. त्यांनी त्यांचा आधार क्रमांक सांगून नगर येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलले, अशी माहितीही माळी यांनी दिली.
------------