अहमदनगर : राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे होते. व्यासपीठावर सचिव झालानी, विश्वस्त येवलेकर, मुख्याध्यापिका गावडे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, आज स्त्री भ्रूणहत्येमुळे समाजाची घडी विस्कटली आहे. ती परत नीट बसविण्यासाठी स्त्रीजन्माचे स्वागत झाले पाहिजे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विद्यालयात स्त्रीजन्माच्या स्वागताचा ठराव घेण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी हात उंच करून ठरावाला मान्यता दिली. तसेच फक्त कन्या असलेल्या परिवारांचाही सन्मान करण्यात आला. ज्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्म होत नाही, त्या कुटुंबातील आईला दोषी ठरवले जाते. तिच्यावर अन्याय, अत्याचार केला जातो, ही बाब थांबविण्यासाठी गुणसूत्राचे विज्ञान प्रत्येक घरात समजावून सांगितले पाहिजे.
संस्थेचे अध्यक्ष खोसे म्हणाले, मुली कुठेही कमी नाहीत. उलट अधिक चिकाटीने, प्रामणिकपणे त्या कार्यरत असतात. डॉ. सुधा कांकरिया यांनी ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ ही चळवळ ३५ वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा सुरू केली. त्यासाठी ११ कलमी कृती कार्यक्रम तयार करून देशभर पोहोचवला. यासाठी तीन तप सुधाताईंनी कार्य केले. यावेळी कांकरिया यांनी उपस्थितांना स्त्रीजन्माच्या स्वागताची शपथ दिली.
---
फोटो-२७ डॉ. सुधा कांकरिया
श्रीकांत पेमराज गुगळे विद्यालयात झालेल्या राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमात बोलताना डॉ. सुधा कांकरिया. समवेत दथरथ खोस, मुख्याध्यापिका गावडे आदी.