सुपा : पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप येथील अप्रकाशित गिरीदुर्गाचा नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी शोध लावला. येथे किल्ल्यावर चढाई मार्गात खडकातून खोदीव मार्ग गेल्याचे आणि अनेक पायऱ्या, पाण्याचे खोदीव टाकेही आढळून आल्याचे कुलथे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात सपाट पठारी भागावर अनेक ऐतिहासिक भुईकोट किल्ले, गढी आणि वेसयुक्त गावे आहेत. परंतु, त्यात आता नव्याने भर पडली आहे ती एका गिरीदुर्गाची. पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप येथील अप्रकाशित अशा भोरवाडी किल्ल्याचा शोध लागला आहे. हरिश्चंद्र गडापासून सह्याद्रीची उप रांग थेट पारनेर शहराच्या दिशेने जाते. पारनेरच्या दिशेने जाताना या उप रांगेची उंची कमी होत जाते. त्यावरील मांडओहोळ धरणाजवळील म्हसोबा झाप ग्रामपंचायतीतील भोरवाडी येथील किल्ला आतापर्यंत अप्रकाशित होता. नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी परिसरात असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आणि अभ्यास करत असताना भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला.
परिसरातील ग्रामस्थ या किल्ल्याच्या टोकदार निमुळत्या आकारामुळे त्याला चुचुळा नावाने संबोधतात. भोरवाडी गावातून मुख्य किल्ला व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या खिंडीतून वर चढाईचा मार्ग आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंतची चढाई ही फक्त ११० ते १२० मीटरची आहे. किल्ल्यावर चढाई मार्गात खडकातून खोदीव मार्ग आणि अनेक पायऱ्या कोरलेल्या दिसून येतात. चढाई मार्गावर तटबंदीचे चिरे ओळीने दिसून येतात. त्यातून प्रवेशद्वार असावे अशी रचना दिसून येते. तटबंदीचे जोते आणि पायऱ्यांजवळ ओळीने छोटी गोलाकार छिद्र कोरलेली दिसून येतात. माथ्यावरील सपाटीच्या भागावर गडफेरी करता येते. पूर्वेकडील भागावर दोन पाण्याचे खोदीव टाके आहेत. हे दोन्ही टाके २६ फूट लांब तर १० फूट रूंद आहे. दोन्ही टाके १० फुटापेक्षा अधिक खोलीचे आहेत. सर्वोच्च माथ्यावर नैसर्गिकरित्या पडलेले अनेक मोठे दगड आहेत.
किल्ल्याच्या प्रत्यक्ष अभ्यास दौऱ्यादरम्यान सुदर्शन कुलथे यांच्याबरोबर राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, भाऊसाहेब कानमहाले आणि मनोज बाग यांनीही किल्ल्याची पाहणी केली. नाशिकचे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व दुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांचे मार्गदर्शन लाभले. भोरवाडीचा किल्ला हा अहमदनगर, संगमनेर आणि जुन्नर या तीन शहरांच्या बरोबर मध्यभागी आहे. तसेच जुन्नर–अहमदनगर महामार्गापासून अगदी जवळ आहे.
----
निजामशाहीतील टेहळणी दुर्ग असण्याची शक्यता..
अहमदनगर निजामशाहीच्या मुख्य भागात हा किल्ला आहे. याची निर्मिती आणि इतिहास निजामशाही काळातील टेहळणी दुर्ग असण्याची शक्यता कुलथे यांनी व्यक्त केली. पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप-भोरवाडीचा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील एकमेव किल्ला प्रकाशात आलेला असून राज्यातील गिरीदुर्गांमध्ये एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
----
१६ म्हसोबा झाप
म्हसोबा झापच्या भोरवाडी गिरीदुर्गावर आढळून आलेला पाण्याचा टाका. त्याची पाहणी करताना नाशिकच्या गिर्यारोहकांचे पथक.