श्रीरामपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर यावी, यासाठी कार्यकर्त्यांनी कामास लागावे, असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले.
श्रीरामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार लंके बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे होते. मंचावर नगराध्यक्षा अनुराधा आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, महिला अध्यक्षा अर्चना पानसरे, राहुरी तालुकाध्यक्ष सुरेश निमसे, नगरसेवक मुक्तार शहा, राजेंद्र चव्हाण, अल्तमेश पटेल, दीपक चव्हाण, प्रकाश ढोकणे, नगरसेविका प्रणिती चव्हाण आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी श्रीरामपूर विकासासाठी योगदान दिले आहे. विकासाची कामे राजकारणापासून गटातटापासून दूर राहून केली. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा आदिक कुटुंबीयांवर मोठा विश्वास आहे. श्रीरामपूरसाठी त्यांची सर्वोतपरी मदत आहे. शासकीय निधीसाठी त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन असते. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी निश्चितच शासन पातळीवर लक्ष वेधण्यात येईल, असे आश्वासन आमदार लंके यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे प्रयत्न करण्यात येईल, असेही लंके म्हणाले.
.......
१८ श्रीरामपूर नीलेश लंके
श्रीरामपूर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आमदार नीलेश लंके.