टाकळी ढोकेश्वर : मोटारसायकलची चोरी करणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या टोळीकडून आठ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून चौकशीसाठी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत करण्यात आली़ पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारसायकल टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्रात लावण्यात आल्या आहेत़ शुक्रवारी रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार हिंगोले यांच्यासह भागीरथ पंचमुख, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार यांनी ही करवाई केली. या टोळीतील दोन मुख्य आरोपी पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा पुण्याला रवाना झाली आहे. या चोरीच्या गाड्यांमध्ये पल्सर, बुलेट, पॅशन, स्कूटी अशा प्रकारच्या दुचाकी आहेत. ही टोळी परिसरात १० ते २० हजार रुपयांमध्ये गाड्या विकत होती. (वार्ताहर)
दुचाकीचोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 14:14 IST