अहमदनगर : अर्बन बँकेत १ कोटी ८० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची लगेच सुटका करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले.नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील १ कोटी ८० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे अध्यक्ष व खासदार दिलीप मनसुखलाल गांधी आणि आजी-माजी संचालकांसह ५४ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील अनेकांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून पोलीस निरीक्षक विजय टिकोळे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी अध्यक्ष गांधी यांना सत्र न्यायालयाने पूर्वीच पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. मात्र जातमुचलक्याची मुदत संपल्याने गांधी यांना आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता अटक केली. त्यांची काहीवेळ चौकशी झाली. जिल्हा सत्र न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजुर केल्याचा आदेश खासदार गांधी यांच्या वकिलांनी गुन्हे शाखेला सादर केला. त्यानंतर खासदार गांधी यांची सुटका करण्यात आली. गांधी यांच्या अटकेची सर्वत्र चर्चा पसरली़(प्रतिनिधी)
गांधी यांना अटक
By admin | Updated: March 13, 2016 14:12 IST