शाळा सुरू करताना शिक्षकांनी काय तयारी करायची, शाळा समितीची बैठक, पालकांचे संमतीपत्र, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण किंवा शाळा सुरू होणार असतील तर किती विद्यार्थी एकावेळी वर्गात बसतीत, त्यांच्यातील सामाईक अंतर किती, पालकांनी कोणती काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे, शाळा भरण्याचा कालावधी किती, दिवसाआड शाळा भरणार की रोज भरणार, कोरोना चाचणी कोणी करायची, याशिवाय कोरोनाच्या इतर खबरदारी काय आदी सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापकांना देणे आवश्यक आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडून शुक्रवारपर्यंत या सूचना तयार झालेल्या नव्हत्या. या सूचनांच्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन त्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. मात्र, शुक्रवारपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची सही या पत्रावर झालेली नव्हती, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढे शनिवार, रविवार व प्रजासत्ताक दिन अशा तीन दिवस शासकीय सुट्या आहेत. केवळ सोमवार हाच कामकाजाचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून हे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांना कधी मिळणार व मुख्याध्यापक, शिक्षक शाळा सुरू होण्याबाबत तयारी कधी करणार, असा प्रश्न उभा राहिला आहे.
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होतानाही असाच विलंब झाला होता. त्यामुळे पहिल्या आठवड्यात बाराशेपैकी केवळ पावणेतीनशे शाळा सुरू झाल्या होत्या. आताही तीच स्थिती असून हा विलंब कशामुळे होत आहे, याची माहिती समजू शकली नाही.
---------
शाळा सुरू करण्याबाबत ज्या सूचना मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना द्यायच्या आहेत, त्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांची सही अद्याप झालेली नाही. ती झाली की, तशा सूचना तातडीने देण्यात येतील.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग